
म. टा. प्रतिनिधी, नगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे बोठे याला जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या प्रकरणात पाच आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार बाळ ज बोठे पसार आहे. बोठे याचा पोलीस कसून शोध घेत आहे. त्यासाठी नगर जिल्ह्याच्या बाहेर पथके पाठवण्यात आले आहेत. नाशिक येथे बोठे एका हॉटेलमध्ये थांबले होते, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक नाशिक येथे गेले होते. मात्र त्यापूर्वीच तेथून बोठे पसार होण्यात यशस्वी झाला. सातत्याने पोलिसांना हूल देण्यास यशस्वी ठरणाऱ्या आरोपी बोठे याला कोणकोण मदत करत आहे? त्याच्या संपर्कात कोण आहे ? याचाही शोध आता पोलिसांनी सुरू केला आहे. बोठे याचे जवळचे मित्रही पोलिसांच्या रडारवर आले असून बोठे त्यांच्याशी संपर्क करतोय का, याचीही माहिती पोलीस घेत आहेत. तर, दुसरीकडे बोठे याने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काल, सोमवारी बोठे याच्या वतीने नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आला आहे. या अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आता बोठेच्या जामीन अर्जावर न्यायालयात काय निर्णय होणार? बोठे याला जामीन मिळणार का ? याकडे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींसह जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. कोर्टात काय होणार? बोठे याच्या वतीने अॅड महेश तवले यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर आज जिल्हा व सत्र न्यायालयात प्राथमिक सुनावणी होईल. तवले यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालय त्यावर सरकार पक्षाला नोटीस काढून त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगू शकते. मधल्या काळात आरोपीतर्फे तात्पुरता अटकपूर्व जमीन, किंवा दिलासा देण्याची मागणी केली जाऊ शकते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3oEdKjT
0 Comments