
म. टा. प्रतिनिधी, मुंबई मुंबईची कन्या फ्लाइंग ऑफिसर ही हवाईदलातील विमान देखभालीसाठी सज्ज झाली आहे. अभियंता असलेल्या रियाने हवाईदलातील दीड वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, ती 'फ्लाइंग ऑफिसर' या हुद्द्यावर हवाईदलात रुजू होत आहे. रिया अय्यर ही मुंबईतूनच इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन्स या क्षेत्रात अभियंता झाली आहे. बीईची पदवी घेतल्यानंतर तिने दोन वर्षे एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी केली. पण, तिथे तिचे मन रमले नाही. स्वत:च्या ज्ञानाचा सर्वोत्तम कार्यासाठी व देशासाठी उपयोग करण्याचा निश्चय तिने केला होता. यासाठी हवाईदलात जाण्याचा निर्णय तिने घेतला. हे ध्येय गाठताना कठोर परिश्रम घेत परीक्षा व मुलाखतीत गुणवत्तेसह उत्तीर्ण झाली. त्यानंतर हैदराबादच्या हवाईदल अकादमीत, तसेच बेंगळुरूच्या हवाईदल तांत्रिक महाविद्यालयातून तिने यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केले. रियाने कॅप्टन (निवृत्त) चंद्रशेखर वराळकर यांच्या शत्रुजित अकादमीतून निवडीसाठीचे प्रशिक्षण घेतले. याबाबत कॅप्टन वराळकर यांनी सांगितले की, 'रियाने खासगी कंपनीतील चांगली नोकरी सोडून हवाईदलात जाण्याचा निर्णय घेतला होता. ही प्रत्येक महिलेसाठी अभिमानाची बाब आहे. तिने एकप्रकारे महिला सबलीकरणाचे उदाहरण उभे केले आहे. शत्रुजित अकादमीतदेखील त्यांनी मन लावून प्रशिक्षण घेतले. यामुळेच पहिल्याच प्रयत्नात तिची निवड झाली.' रिया ही अभियंता आहे. यामुळे ती आता हवाईदलाच्या देखभाल व दुरुस्ती विभागात जाणार आहे. याअंतर्गत विविध विमानांच्या देखभालीची जबाबदारी तिच्यावर असेल. त्याअंतर्गत एका विशेष प्रशिक्षणासाठी ती लवकरच मोठ्या हवाईतळावर रुजू होणार आहे. अभियंत्यांना संधी हवाईदलात फक्त वैमानिक असतात, असा सर्वमान्य समज असतो. परंतु, ही विमाने सुस्थितीत असणे अत्यावश्यक असते. ते काम अभियंतेच करतात. त्यामुळेच कुठल्याही श्रेणीत अभियंता झाल्यास परीक्षा, मुलाखत व प्रशिक्षणाद्वारे हवाईदलात जाण्याची चांगली संधी बीई झालेल्यांना असल्याचे रिया अय्यर हिने दाखवून दिले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2VT0Ku2
0 Comments