गौरी भिडे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्याच्या मुहूर्तावर आवर्जून नव्या गोष्टींची खरेदी होते. एखाद्या नव्या कामाची सुरुवातही या मंगल मुहूर्तावर केली जाते. यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर संगीतप्रेमींना एक विशेष सांगीतिक भेट मिळणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री-कवयित्री नं लिहीलेलं एक नवीन गीत दसऱ्याच्या दिवशी, म्हणजे आज २५ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येतंय. 'माझ्याच आसवांचे...' असे आर्तपूर्ण शब्द असलेलं हे गीत, सध्या अमेरिकेला स्थायिक असणाऱ्या नेहा वर्मानं गायलं आहे. अभिजीत सावंतनं त्याला संगीत दिलं आहे. 'स्मृतिगंध' या फेसबुक पेजवरून हे गाणं दसऱ्याच्या दिवशी प्रकाशित होणार आहे. काही वर्षांपूर्वी संगीतकार अभिजीत सावंतला एक चाल सुचली. ती चाल त्यांनी स्पृहाला पाठवली आणि त्या चालीवर स्पृहाने या गाण्याचे शब्द लिहून दिले. या गाण्याचं संगीत संयोजन आणि प्रोग्रामिंग प्रशांत लळीत यांचं असून विजय तांबे यांनी बासरी, तर श्रुती भावे यांनी व्हायोलिनची साथ केली आहे. गाण्याचं ध्वनिमुद्रण सौरभ काजरेकर (बझइन स्टुडिओ) यांनी केलं असून, व्हिडीओचं चित्रीकरण डॉ. आलोक खोले यांनी तर संकलन जुई बाग यांनी केलं आहे. 'हे गाणं अनेक वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलं आहे. काही गाण्यात सगळं काही जुळून येतं, तसं या गाण्याचं आहे. मनाला भिडणारं असं हे गाणं मला गायला मिळालं याचा मला आनंद आहे', असं गायिका नेहा वर्मानं सांगितलं. काही गाण्यांची चाल ऐकून त्यातले भाव लगेच जाणवतात. प्रत्येक चाल आपल्याला लिहीण्यासाठी काहीतरी देत असते. तसं हे चालीवर लिहिलेलं गाणं आहे. ही चाल ऐकून माझ्या मनात कुठेतरी एकटेपणा, आर्तता, विरह हे भाव दाटून आले. अक्षरशः काहीही न ठरवता शब्द अचानक सुचत गेले. चाल ऐकून मला तेव्हाही इतकं भारावल्यासारखं झालं होतं, तसंच आत्ताही झालं. गाण्याचे शब्द आणि गोडवा हे दोन्ही या चालीमुळे छान जपलं गेलंय असं मला वाटतं. - स्पृहा जोशी
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/37DjsNB

0 Comments