Ticker

6/recent/ticker-posts

'हिंदीत बोल' म्हणणाऱ्या एअरटेल कर्मचाऱ्याला मनसेचा दणका

मुंबई: 'मला मराठी येत नाही हिंदीत बोल' असं एका ग्राहकाला सांगणाऱ्या एअरटेलच्या एका कर्मचाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारत माफी मागायला लावली. येथील एअरटेलच्या गॅलरीत काल हा प्रकार घडला. मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी या संदर्भातील व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. एअरटेल कंपनीच्या गॅलरीमध्ये एक मराठी युवक मोबाइल रिचार्ज करण्यासाठी गेला होता. त्याला २४९ रुपयांचा रिचार्ज करायचा होता. त्यासाठी त्याने ५०० रुपये एरटेल कर्मचाऱ्याला दिले. उरलेले २५१ रुपये त्याला येणे अपेक्षित होते. परंतु एयरटेल कर्मचाऱ्याने १ रुपया कमी दिला. त्याबद्दल युवकाने विचारणा केल्यावर एयरटेल कर्मचाऱ्याने तुसड्या स्वरात त्याचे परतीचे पैसे देणे नाकारले. शिवाय, 'मला मराठी येत नाही तू हिंदीत बोल' असं सांगितलं व इतर कर्मचाऱ्यांची मदत घेऊन त्या युवकासोबत वाद घातला. संबंधित युवकाने नयन कदम यांना ही माहिती दिली. त्यानंतर कदम यांनी मनसैनिकांना तातडीने चारकोप येथील एयरटेल गॅलरीमध्ये त्या युवकासोबत पाठवले. तिथल्या कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला असे काहीही न घडल्याचे सांगितले व उद्धटपणे वर्तन केले. मात्र, मनसैनिक आक्रमक होताच सर्व गोष्टी कबूल केल्या व माफी मागितली. तिथल्या कर्मचाऱ्याने सरते शेवटी सर्व कर्मचारी मराठीत बोलतील व त्यांना मराठी भाषा शिकवण्यात येईल, असे आश्वासन दिले. एअरटेलच्या कारभाराबद्दल नयन कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनाच दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला. 'एअरटेल ही कंपनी देशभर कारभार करते. त्या-त्या राज्यातील ८० टक्के कर्मचाऱ्यांना या कंपनीने रोजगार द्यायला हवा व तेथील कर्मचाऱ्यांना तेथील भाषा यायला हवी. त्यांचा हा कारभार असाच सुरू राहिला तर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशाराही कदम यांनी दिला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hBVLY9

Post a Comment

0 Comments