काठमांडू: मागील काही महिन्यांपासून नेपाळच्या राजकारणात सातत्याने लुडबुड करणाऱ्या चीनला झटका बसला आहे. चीनच्या नेपाळमधील राजदूत हाओ यांकी यांना आता पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि राष्ट्रपतींना थेट भेटता येणार नाही. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने राजदूतांसाठी नवीन नियमावली तयार केली आहे. त्यानुसार आता कोणत्याही देशाच्या राजदूताला थेट राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटता येणार नाही. सीमा प्रश्नी भारताविरोधात भूमिका घेतल्यानंतर आणि इतर मुद्यावर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात मतभेद निर्माण झाले होते. नेपाळमधील दिग्गज कम्यु्निस्ट नेते प्रचंड हे केपी शर्मा ओली यांच्या भूमिकेवरून नाराज होते. या वादातून पक्षात फूट पडून सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशा वेळी चीनच्या राजदूत हाओ यांकी सक्रीय झाल्या होत्या. त्यांनी नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांसह राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांच्याशी थेट भेट घेत चर्चा केली होती. राष्ट्रपतींच्या भेटीबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या अवर सचिवांना याची माहिती देण्यात आली नव्हती. शिष्टाचारानुसार, या भेटीची माहिती देणे आणि भेटी दरम्यान प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक होती. मात्र, त्यांना या भेटीपासून दूर ठेवण्यात आले होते. ओली यांच्या हातातून सरकार जाऊ नये यासाठी चीनने मोठे प्रयत्न चालवले होते. चीनच्या या लुडबुडीविरोधात नेपाळमधील राजकीय विश्लेषकांनी आणि माजी परराष्ट्र अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. वाचा: चीनच्या राजदूत हाओ यांकी या नेपाळमध्ये चीनचा अजेंडा राबवत असल्याची चर्चा सुरू होती. ओली यांनी भारताविरोधात घेतलेल्या भूमिकेमागे चीनचाच हात असल्याचा आरोप करण्यात येत होता. भारताविरोधात भूमिका घेतल्यांनंतर पंतप्रधान ओली यांना पक्षातूनच मोठा विरोध झाला होता. त्यानंतर भारतानेही नेपाळच्या आगळकीविरोधात कठोर भूमिका घेतली होती. हाओ यांकी यांच्या हस्तक्षेपाला देशातूनही मोठ्या प्रमाणावर विरोध होत असल्याने ओली सरकार एक पाऊल मागे आले असून राजदूतांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. वाचा: वाचा: भारत आणि नेपाळचे चांगले संबंध असताना लिपुलेखा मार्गाच्या बांधकामावरून नेपाळ सरकारने भारतविरोधी भूमिका घेतली. त्यानंतर संविधान दुरुस्ती करत नेपाळने भारताच्या भूभागावरही दावा ठोकला. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये कधी नव्हे तो तणाव निर्माण झाला. भारत-नेपाळ वाद आणि चीनने नेपाळचा काही भूभाग ताब्यात घेतले असल्याचे समोर आल्यानंतर पंतप्रधान ओली यांच्याविरोधात वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hBjJ5N

0 Comments