बोकोरो: देशात अनेक ठिकाणी भ्रूणहत्येची () समस्या असताना आपल्याला मुलगी व्हावी या साठी अनेक जोडपी मंदिराबाहेर रांगेत उभी राहत असल्याचेही चित्र दिसून येत आहे. झारखंडमधील बोकारा जिल्ह्यातील येथील चाकुलिया गावातील एका १७० वर्षे जुन्या दुर्गा मंदिरातील हे चित्र आहे. आपल्याला मुलगी व्हावी यासाठी शेकडो जोडप्यांनी आतापर्यंत या मंदिरात नवस केल्याचे गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात. या मंदिरातील दुर्गामातेवर गावातील रहिवाशांची मोठी श्रद्धा असल्याचेही गावकरी सांगतात. दरवर्षी येथे घटस्थापनेपासून दुर्गापूजेला आरंभ होतो. या मंदिरात १५० वर्षे जुने एक तांब्याचे भांडे आहे. या भांड्याची देखील गावकरी पूजा करतात. दुर्गामातेचा प्रत्येक भक्त या मंदिरात नेहमीच भेट देत असतो. मात्र नवरात्रोत्सवात मात्र शेकडो लोक येथे येऊन आपल्याला मुलगी व्हावी हे मागणे मंदिरातील सिद्धिदात्री दुर्गामातेपुढे करतो, असे गावकरी सांगतात. एका दंतकथेनुसार, या गावातील कालिचरण दुबे नावाच्या एका भक्ताने १५० वर्षांपूर्वी या मंदिरात येऊन आपल्याला मुलगी व्हावी यासाठी प्रार्थना केली होती. ही माहिती सगळीकडे पसरल्यानंतर आपल्याला मुलगी व्हावी यासाठी अनेक लोक मंदिरात येऊ लागले. प्रत्येक वर्षी आपल्याला मुलगी व्हावी या मागणीसाठी या मंदिरात जोडपी येत असल्याचे मनोज कुमार या गावकऱ्यानेही सांगितले. अनेकांची मनोकामना येथे येऊन पूर्ण झालेली आहे. सर्व भक्त येथे येऊन मोठ्या भक्तीभावाने देवीची पूजाअर्जना करतात, असे मनोज कुमार यांनी सांगितले. या वर्षी करोनाची महासाथ असल्याने येथे प्रतिकात्मक पूजा केली जाणार आहे. देवीचा एक भक्त सूर्यकांत सिंह यांनी सांगितले की, आमच्या घरात मुलगाच नव्हता, मात्र आपल्या घरात मुलगी असावी असे आम्हाला वाटत होते. आम्ही येथे आलो देवीची पूजा केली आणि आम्हाला मुलगी व्हावी अशी प्रार्थना आम्ही देवीपुढे केली. त्यानंतर आम्हाला मुलगी झाली. माझे कुटुंब दरवर्षी या देवीच्या मंदिरात दुर्गा पूजेसाठी येते. या गावातील आणखी एक रहिवासी कातायनी देवी यांनी सांगितले की, मी माझ्या मुलीचे नाव देवीच्या नावावरून भवानी असे ठेवले आहे. माझ्या प्रमाणेच अनेकजण ज्यांना मुलगी हवी आहे असे वाटते ते सर्व देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे येत असतात असे देवी म्हणाल्या. माझी मुलगी मला देवीच्या आशीर्वादानेच झाल्याचे त्या म्हणाल्या. (प्रार्थना केल्याने मूल होते हे सांगणे हा या बातमीचा उद्देश नसून मुलगी नको म्हणून होत असताना दुसरीकडे अनेक लोक मुलगी हवी म्हणून प्रार्थना करत आहेत हा सकारात्मक दृष्टीकोन दाखवणे हाच या बातमीचा उद्देश आहे.)
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mj4QqQ

0 Comments