Ticker

6/recent/ticker-posts

बँकांच्या स्पर्धेत पोलिसांची दिवाळी; एचडीएफसीनंतर अक्सिस बँकेनेही दिल्या वाढीव सुविधा

म.टा. प्रतिनिधी, नगर : महाराष्ट्र पोलिसांची एचडीएफसी बँकेत वळविण्याचा निर्णय सरकारने घेतला. यासाठी एचडीएफसी बँकेने जादा सोयी-सुविधा दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता अक्सिस बँकही यासाठी सरसावली असून त्यांनी एक पाऊल पुढे टाकत वेतन खाती असलेल्या पोलिसांना जादा सोयी-सुविधा दिल्या आहेत. १५ नोव्हेंबरपासून या सुविधा लागू झाल्या आहेत. बँकांच्या स्पर्धेत पोलिसांचा मात्र फायदा होताना दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अक्सिस बँकेत उघडण्यात आली होती. त्यासंबंधी करण्यात आलेल्या कराराची मुदत यावर्षी ३१ जुलैला संपली. महाविकास आघाडीच्या सरकारने या कराराचे नुतनीकरण करण्याऐवजी नव्याने प्रस्ताव मागविले. यामध्ये एचडीएफसी बँकेने दिलेल्या सोयी सुविधा सरस ठरत असल्याचे सांगून त्या बँकेसोबत करार करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी अक्सिस बँकेतील वेतन खाती बंद करून एचडीएफसी बँकेत सुरू करण्याचा आदेश देण्यात आला. एचडीएफसी बँकेकडून पोलिसांना बऱ्याच सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत. नैसर्गिक किंवा करोनामुळे मृत्यू झाल्यास १० लाखांचे विमा संरक्षण, अपघाती मृत्यू झाल्यास १ कोटींपर्यंत विमा कवच, अपघातात अपंगत्व आल्यास ५० लाखांचे विमा कवच, अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना १० लाख रुपये शिक्षणासाठी, रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास ३० दिवसांपर्यंत प्रति दिन एक हजार रुपये मदत, अशा सुविधा देण्यात येणार आहेत. मधल्या काळात अक्सिस बँकेनेही वाढीव सुविधा देण्याची तयारी दर्शविली. ज्या पोलिसांची वेतन खाती अक्सिस बँकेतच राहतील, त्यांच्यासाठी १५ नोव्हेंबरपासून या सुविधा देण्याचा करारच या बँकेने महाराष्ट्र पोलिसांसोबत केला आहे. या कराराची माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाकडून सर्व पोलिसांना कळविण्यात आली आहे. ज्यांची इच्छा आहे, ते पोलिस याच बँकेत वेतन खाती ठेवू शकणार आहेत. अक्सिस बँकेने एक पाउल पुढे टाकत खातेदार पोलिसांना सुविधा दिल्या आहेत. १.०५ कोटी रुपयांचे वैयक्तिक अपघात विमा सरंक्षण, दहा लाख रुपयांचे वैयक्तिक अतिरिक्त अपघात विमा संरक्षण, दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्यास अतिरिक्त १० लाख रुपयांचे विमा संरक्षण, अपत्यांच्या शिक्षणांसाठी ८ लाख रुपये शैक्षणिक सुविधा, मुलगी असल्यास आणखी ८ लाख रुपये. १० लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण, करोना झाल्यास रुग्णालयातील उपचारांसाठी ५० हजार रुपयांपर्यंतचे संरक्षण, करोनामुळे मृत्यू झाल्यास एक लाख रुपयांचे अतिरिक्त विमा संरक्षण अशा सोयी-सुविधा अक्सिस बँकेने पोलिसांसाठी दिल्या आहेत. एकूण दीड कोटी रुपयांचे विमा सरंक्षण पोलिसांना मिळणार आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी या कराराची माहिती राज्यातील पोलिसांनी कळविली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/393aV7h

Post a Comment

0 Comments