Ticker

6/recent/ticker-posts

शहीद जवान यश देशमुख अनंतात विलीन; लहान भावाने दिला मुखाग्नी

म. टा. प्रतिनिधी, : जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील शहीद जवान यश दिगंबर देशमुख अनंतात विलीन झाले. आज शनिवारी (दि.२८) दुपारी १२ वाजता घोडेगाव रस्त्यावरील मोकळ्या पटांगणात त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान भावाने साश्रूनयनांनी मुखाग्नी दिला. यश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय, मित्रपरिवारासह जिल्हाभरातून हजारो नागरिक पिंपळगावात आलेले होते. पिंपळगावासह आजूबाजूनच्या परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. अंत्ययात्रेत देशभक्तीपर गीते वाजवली जात होती. अंत्ययात्रेत सहभागी झालेले तरुण 'भारत माता की जय', 'वंदे मातरम', 'अमर रहे... अमर रहे... शहीद जवान अमर रहे', अशा घोषणा देत होते. जम्मू काश्मिरात दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत गुरुवारी दुपारी यश यांना हौतात्म्य आले होते. त्यानंतर आज सकाळी १० वाजता त्यांचे पार्थिव मूळगावी पिंपळगावात दाखल झाले. लष्करी गार्डच्या तुकडीने नाशिक येथून त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी गावात आणले. कुटुंबीयांना यश यांचे अखेरचे दर्शन व्हावे म्हणून पार्थिव घरी आणण्यात आले. कुटुंबीय आणि आप्तेष्टांना दर्शनासाठी पार्थिव काही वेळ घरी ठेवल्यानंतर लगेचच अंत्ययात्रेला सुरुवात झाली. सजवलेल्या वाहनातून मिरवणूक यश यांच्या राहत्या घरापासून अखेरची मिरवणूक निघाली. लष्कराच्या सजवलेल्या वाहनातून ही मिरवणूक निघाली. मिरवणुकीत लष्कराचे अधिकारी, जवान, स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उसळणार असल्याची शक्यता गृहीत धरून अंत्यसंस्कारासाठी घोडेगाव रस्त्यावरील मोकळ्या पटांगणात व्यवस्था करण्यात आली होती. गावातील महिला व युवतींनी अंत्यसंस्काराच्या मिरवणूक मार्गावर सकाळीच सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. गावात ठिकठिकाणी यश यांना आदरांजली अर्पण करणारे बॅनर लागले होते. गावाच्या सुपुत्राला अखेरचा देण्यासाठी समस्त पिंपळगाववासी आपल्या परीने शक्य ते प्रयत्न करताना दिसून आले. अंत्ययात्रेला सुरुवात झाल्यानंतर गावातील प्रत्येक घराच्या गच्चीवरून महिला, युवती, लहान मुले मिरवणुकीवर पुष्पवर्षाव करत होते. यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कुटुंबीयांचा आक्रोश सैन्य दलात नोकरीला लागल्यानंतर अवघ्या वर्षभरातच ते शहीद झाले. त्यांच्या निधनामुळे देशमुख कुटुंबावर मोठे आभाळ कोसळले आहे. अंत्यसंस्कारावेळी वडील दिगंबर देशमुख, आई सुरेखाबाई, मोठ्या दोन्ही बहिणी तसेच लहान भावाने प्रचंड आक्रोश केला. यावेळी उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. राज्य शासनाकडून १ कोटींच्या मदतीची घोषणा यश देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील व कृषिमंत्री दादा भुसे यांनी शहीद यश देशमुख यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून १ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. सैन्य दलातील जवान शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून आर्थिक मदत केली जात असल्याचे दादा भुसे यांनी यावेळी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2JjAkPe

Post a Comment

0 Comments