
मुंबई : दसरा सरल्यानंतर सराफा बाजारात पुन्हा एकदा मरगळ आली आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या आणि अमेरिकेतील घडामोडींनी कमॉडिटी बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज बुधवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०९४३ रुपये असून त्यात १८ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा एक किलोचा भाव ६२०६५ रुपये असून त्यात २१६ रुपयांची घट झाली आहे. goodreturns.in या वेबसाईटनुसार बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९९१० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ५०९१० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९६१० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५३११० रुपये आहे. कोलकात्यात ग्राहकांना २२ कॅरेट सोने खरेदीसाठी ५००१० रुपये मोजावे लागत आहेत. तर २४ कॅरेटचा भाव ५२८१० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोने प्रती १० ग्रॅमसाठी ४७५७० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५१८९० रुपये आहे. कमॉडिटी बाजारात सोने अजूनही त्याच्या विक्रमी स्तरापासून ५५०० रुपयांनी स्वस्त आहे. सोन्यातील सध्याचा ट्रेड पाहता सोने ५१२०० पर्यंत स्थिरावेल, असा अंदाज जिओजित फायनान्शिअल या ब्रोकरेज संस्थेने व्यक्त केला आहे. तर चांदीसाठी ६१००० चा स्तर आहे. त्याखाली तर चांदीचा भाव गडगडगला तर तो आणखी कमी होईल, असे या संस्थेनं म्हटलं आहे. जागतिक बाजारात डॉलरचे मूल्य इतर चलनांच्या तुलनेत वधारले आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या मूल्यावर दबाव निर्माण झाला आहे. स्पॉट गोल्डचा भाव ०.१ टक्क्यांनी कमी होऊन १९०५.५१ डॉलर प्रती औंसवर स्थिरावला. डॉलर इंडेक्स ०.२२ टक्क्यांनी वधारला आहे. चांदीच्या भावात देखील १ टक्क्याची घसरण झाली आहे. चांदीचा भाव प्रती औंस २४.३० डॉलर इतका आहे. अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली. निवडणुकीतील घडामोडींचे पडसाद कमॉडिटी मार्केटवर उमटणार असल्याचे बोलले जात आहे. मागील काही सत्रांमध्ये गोल्ड ईटीएफमधील गुंतवणुकीत अस्थिरता दिसून आली आहे. एसपीडीआर या जगातील सर्वात मोठ्या गोल्ड ईटीएफ फंडात मंगळवारी ०.२३ टक्के वाढ झाली आणि तो १२६६.७२ टन इतका वाढला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3oyF03R
0 Comments