
अंकारा: तुर्कीमधील इजमिर शहरात शुक्रवारी आलेल्या भूकंपामुळे हाहाकार उडाला. या भूकंपात कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यातून लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ८०० जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तुर्कीतील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आरोग्य मंत्री फर्हेटीन कोका यांनी सांगितले की, ४३५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर, २५ जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. नऊ जणांवर शस्त्रक्रिया पार पडली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याशिवाय ३६४ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. इजमिरमध्ये मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. शुक्रवारी स्थानिक वेळ दुपारी तीन वाजता रिश्टर स्केलवर ७ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली होती. भूकंपानंतर जवळपास २४४ अफ्टरशॉक्स जाणवले असल्याची माहिती तुर्कीच्या आपात्कालीन विभागाने दिली. त्याशिवाय रिश्टर स्केलवर ४ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. इजमिरचे राज्यपाल यवुज सलीम कोझर यांनी सांगितले की, भूकंपामुळे किनारपट्टीवरील सेफेरिसार या जिल्ह्यात सुनामीची लाट आली होती. यामध्ये एकजण जखमी झाला. कोस्ट गार्ड कमांडचे ११६ कर्मचारी, ११ बोटी, तीन हेलिकॉप्टर मदत आणि बचाव कार्यात पोहचले आहेत. तुर्की रेड क्रिसेंटने ११२ कर्मचारी, १३७ स्वयंसेवक, २७ वाहने आणि पाच मोबाइल फिल्ड किचन तैनात केले आहेत. यामुळे २५ हजारजणांच्या जेवणाची व्यवस्था होणार आहे. भूकंपाचे केंद्र ग्रीसमधील कार्लोवसियन शहराच्या उत्तर-पूर्व भागात १४ किमी दूर अंतरावर होते. जमिनीपासून कमी खोलवर भागात भूकंपाचे केंद्र असल्यामुळे तीव्र झटका लागला. यामुळेच अधिक इमारतींचे नुकसान झाले असल्याचे अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वेने म्हटले. वाचा: याआधीदेखील भूकंपानेे हाहाकार ग्रीस आणि तुर्की हे दोन्ही देश भूकंपप्रवण क्षेत्रात येतात. याआधी १९९९ मध्ये तुर्कीच्या वायव्य भागात ७.४ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंप झाला होता. यामध्ये १७ हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये इस्तांबूलमधील एक हजार नागरिकांचा समावेश आहे. तर, २०११ मध्ये दक्षिणपूर्व भागात झालेल्या भूकंपामध्ये ६०० जणांचा मृत्यू झाला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2JmY84S
0 Comments