: शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातून सहा लाखांची रोख रक्कम लांबविणाऱ्या ऑफिस बॉयसह कार्यालयातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे़. संतोष राणा, अकाश निकम आणि मयुर कऱ्हाडे अशी संशयितांची नावे असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. संतोष देविदास धनुका या बांधकाम व्यवसायिकाचे जालना रोडवरील सिंचनभवन समोर कार्यालय आहे. शुक्रवारी (२३ ऑक्टोबर ) धनुका यांनी बांधकाम साहित्य आणि कामगारांच्या रोजंदारीची रक्कम देण्यासाठी सहा लाख रुपये आणूण ठेवले होते. त्यांनी रकमेची बॅग दालनात ठेवली होती. धनुका हे कामानिमित्त काही वेळासाठी दालनाबाहेर गेले होते. परत आल्यावर रक्कम गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असता, त्यांनी तातडीने जिन्सी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. सहा लाखांची रोख रक्कम गायब झाल्याची माहिती मिळताच जिन्सी ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या तपासात असे समोर आले की, कार्यालयात संतोष राणा, अकाश निकम आणि मयुर कऱ्हाडे हे देखील कामाला आहेत. या पैकी कऱ्हाडे आणि आकाश नेमके गायब झाल्याचे लक्षात आले. दालनात रक्कम असल्याची माहिती तिघांपैकी संतोष राणाला होती. म्हणून जिन्सी पोलिसांनी राणाला अटक केली. ही रक्कम अकाश निकम याच्याकडे असल्याची कबुली दिली. तोपर्यंत गुन्हे शाखेच्या टीमने आकाश आणि मयूर कऱ्हाडेला ताब्यात घेऊन रोख रक्कम हस्तगत केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3joGdqR

0 Comments