
वॉशिंग्टन: राजकीय भूमिकांमुळं अनेकदा वादात सापडणारे अमेरिकेचे अध्यक्ष आता व्यावसायिक कारणांमुळं चर्चेत आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल १० वर्षे कर भरलेला नससल्याचं समोर आलं आहे. व्यवसायात प्रचंड तोटा झाल्यानं ट्रम्प यांना टॅक्स भरता आलेला नाही, असं कारण समोर आलं आहे. अमेरिकेतील आघाडीचं दैनिक 'न्यूयॉर्क टाइम्स'नं या संदर्भात एक सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार, सन २००० नंतरच्या १५ वर्षांपैकी दहा वर्षांत ट्रम्प यांनी कर भरणा टाळला आहे. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतरच्या पहिल्या वर्षात ट्रम्प यांनी केवळ ७५० डॉलरचा कर भरल्याचं 'न्यूयॉर्क टाइम्स'नं म्हटलं आहे. वाचा: अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी 'प्रेसिडेन्शियल डिबेट' होत आहे. त्या पार्श्वभूमीवर 'न्यूयॉर्क टाइम्स'नं प्रसिद्ध केलेल्या या वृत्तामुळं खळबळ उडाली आहे. हे वृत्त प्रसिद्ध होताच ट्रम्प यांनी रविवारी व्हाइट हाउसमध्ये पत्रकार परिषद घेतली. 'मी मोठ्या प्रमाणावर कर भरल्याचं त्यांनी म्हटलं आहे. फेडरल टॅक्स बरोबरच राज्यांतही टॅक्स भरल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपले इन्कम टॅक्स रिटर्न सार्वजनिक करण्याची तयारीही ट्रम्प यांनी दर्शवली आहे. अर्थात, देशाच्या तिजोरीत कराच्या रूपाने नेमकी किती रक्कम भरली हे ट्रम्प यांना सांगता आले नाही. हा प्रश्न येताच त्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली. ट्रम्प यांच्या कंपनीचे प्रवक्ते अॅलन गार्टन यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 'न्यूयॉर्क टाइम्सचे वृत्त तथ्यावर आधारलेले नाही. ट्रम्प यांनी व्यक्तिगत उत्पन्नातून कोट्यवधी डॉलरचा कर फेडरला सरकारला दिला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी झाल्यानंतरच्या २०१५ वर्षातील कराचाही यात समावेश आहे, असं गार्टन यांनी म्हटलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2G9pBoZ
0 Comments