मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी सलग ३३ व्या दिवशी इंधन दर जैसे थेच ठेवले आहेत. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतीत घसरण होत असली तरी महिनाभरापासून देशातील इंधन दर जैसे थेच आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांबाबत ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे. आज मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा ८१.०६ रुपये असून डिझेलचा भाव ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे. करोना बळावल्यामुळे डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ३७ डॉलर प्रती बॅरलवर आहे. ब्रेंट क्रूडचा भाव ३८.९७ डॉलर प्रती बॅरल झाला आहे. युरोप आणि अमेरिकेतील रुग्णसंख्या वाढल्याने तेलाच्या अर्थकारणावर नकारात्मक परिणाम झाला. अमेरिका आणि रशियात कोव्हिड-१९ चे रुग्ण वाढल्यामुळे तेलाच्या किंमती घसरल्या. युरोपियन देशांत विषाणूमुळे नवे निर्बंध लादले गेल्याने जागतिक आर्थिक सुधारणेची गती आणखी कमी होऊ शकते व त्यामुळे तेलाचे दरही आणखी घसरू शकतात. अनलॉकचा पाचवा टप्पा देशात सुरु असून रस्त्यावरील वाहनांची रहदारी वाढली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्या देखील काही प्रमाणात सुखावल्या आहेत. इंधन मागणी वाढल्याने अर्थव्यवस्था सावरत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान , अजूनही करोना संकाटातून कमाॅडिटी बाजार सावरलेला नाही. सध्या अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. मतमोजणी सुरु असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमेरिका कच्च्या तेलाची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे तेथील निकालांचा तेलाच्या बाजारपेठेवर परिणाम होण्याचा अंदाज जाणकांरानी व्यक्त केला आहे. जागतिक बाजारात आज क्रूड आॅइलचा भाव प्रती बॅरल २ टक्क्यांनी वधारला आणि ३८.६७ डाॅलरपर्यंत गेला आहे. ब्रेंट क्रूडच्या दरात मंगळवारी ३ टक्के वाढ झाली होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32ecxHc

0 Comments