अहमदनगर: कांद्याची भाववाढ कायम राहील, या आशेवर साठवून ठेवलेला आणि नव्याने पिकविलेला कमी भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पुन्हा लॉकडाउन होण्याच्या चर्चेची धास्ती घेऊन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केल्याने भावात तीन ते चार हजारांनी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीपूर्वी कांद्याचे भाव वाढले होते. साधारणपणे आठ ते नऊ हजार रुपये क्विंटलप्रमाणे बाजार समितीत कांद्याचे लिलाव होत होते. भाववाढीची शक्यता लक्षात घेऊन निर्यातीपासून साठवणुकीपर्यंत विविध निर्बंध सरकारने लागू केले. कांदा आयातीचाही प्रयोग झाला. तरीही बराच काळ कांद्याचे भाव टिकून होते. कांद्याचा भाव कायम राहील असा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी नवीन कांद्याची लागवडही केली. जुना कांदा संपत असताना हा नवा उन्हाळी कांदा आता बाजारात येऊ लागला आहे. वाचा: दिवाळीनंतर मात्र, अचानक भाव घसरले आहेत. करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवून पुन्हा लॉकडाउन केले जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. पहिल्या लॉकडाउनचा फटका शेती मालाच्या वाहतुकीलाहही बसला होता. हा अनुभव लक्षात घेऊन कथित लॉकडाउनच्या आधी आपला माल विकून मोकळे व्हावे, असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे. शिवाय वादळी पावसाची शक्यता व्यक्त होत असल्याने नुकसान टाळण्यासाठीही कांदा विक्रीला काढला आहे. त्यामुळे चाळीत साठविलेला जुना कांदा तर बाहेर काढलाच, शिवाय नव्याने उत्पादित कांदाही लगेच बाजारात आणण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये शेकडो क्विंटल कांद्याची आवक होऊ लागली आहे. कांद्याचे लिलाव असलेल्या दिवशी बाजार समित्यांच्या बाहेर कांदा घेऊन आलेल्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांना साठवणुकीवरील बंधने आणि त्यांनाही वाटणारी लॉकडाउनची धास्ती यामुळे लिलावातील खरेदीवरही परिणाम होत आहे. यामुळे कांद्याचे भाव घसरले आहेत. पूर्वी एक नंबर कांद्याला सात ते आठ हजार रुपये क्विंटल हमखास भाव मिळत होता. आता तोच भाव साडेतीन ते चार हजारांपर्यंत घसरला आहे. त्यापेक्षा कमी प्रतीचा कांदा एक ते अडीच हजार रुपये क्विंटलने खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. कोथिंबीर गडगडली! मधल्या काळात २० ते २५ रुपये जुडीपर्यंत गेलेली कोथिंबीरीचे भावही गडगडले आहेत. भाववाढ झाल्याने मोठ्या प्रमाणात कोथिंबीर लावण्यात होती. त्यामुळे उत्पादन आणि आवक वाढली असून कोथिंबीरीची जुडी २ ते पाच रुपयांना विकली जात आहे. वाहतूक खर्चही परवडत नसल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कोथिंबीरीच्या पिकावर नांगर चालविल्याचे दिसून येते. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3l1gO79

0 Comments