बाकू: रशियाने केलेली मध्यस्थीही अयशस्वी ठरली असून नागोर्नो-काराबाखमध्ये आर्मेनिया आणि अजरबैझानमध्ये युद्ध सुरूच आहे. बुधवारी सैन्यांच्या ठिकाणांवर अजरबैझानने केलेल्या हल्ल्याला आर्मेनियाने प्रत्युत्तरात लष्करी कारवाई केली आहे. आर्मेनियाने केलेल्या गोळीबारात १२ नागरीक ठार झाले असून ४० हून अधिक जखमी झाले असल्याचे अजरबैझानने म्हटले आहे. आर्मेनियाच्या लष्कराने गांजा शहर आणि घनदाट लोकसंख्या असलेल्या भागात रॉकेट हल्ला केला असल्याचे अजरबैझान सरकारने म्हटले आहे. आर्मेनियाचे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते शुशन स्टीफनियन यांनी बुधवारी नागोर्नो-काराबाख भागात लष्करावर होत असलेल्या हल्ल्याबद्दल अजरबैझानचा निषेध केला होता. त्याचवेळी त्यांनी आर्मेनिया सरकार या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार असल्याचेही त्यांनी म्हटले. नागोर्नो-काराबाख भागावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचा अजरबैझानचा उद्देश्य असल्याचा आरोप आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनियन यांनी केला. वाचा: आर्मेनिया आणि अजरबैझान यांच्यातील युद्ध थांबावे यासाठी रशियाने मध्यस्थीचा प्रयत्न केला. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीही लागू केली. मात्र, शस्त्रसंधी मोडल्याचा आरोप दोन्ही देशांनी एकमेकांवर केला आणि त्यानंतर पुन्हा युद्धाला तोंड फुटले. त्यामुळे ही मध्यस्थी यशस्वी झाली नाही. या दोन्ही देशांमध्ये १९९४ मध्ये युद्ध झाले होते. त्यानंतर आता सुरू झालेले युद्ध गंभीर असल्याचे म्हटले जाते. आर्मेनिया आणि अजरबैझान या दोन्ही देशांना ४४०० चौकिमी क्षेत्रफळ असणाऱ्या नागोर्नो-काराबाख भागावर ताबा मिळवायचा आहे. तर, दुसरीकडे नागोर्नो-काराबाख स्वत:ला एक स्वतंत्र देश असल्याचा दावा करत आहे. रशिया आणि तुर्कीत युद्ध? आर्मेनिया आणि अजरबैझानमध्ये वाढत्या युद्धामुळे रशिया आणि तुर्कीदेखील या युद्धात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशियाने आर्मिनियाला पाठिंबा दिला आहे. तर, दुसरीकडे अजरबैझानसोबत नाटो, तुर्की आणि इस्रायलसारखे देश आहेत. आर्मेनिया आणि रशियात संरक्षण करार आहे. त्यामुळे आर्मेनियाच्या भूमीवर युद्ध सुरू झाल्यानंतर रशिया या करारानुसार मदतीसाठी धावून येऊ शकतो. त्याशिवाय आर्मेनियामध्ये रशियाचे लष्करी तळदेखील आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nWDLet

0 Comments