नागपूर: महिला निराधार असल्याचा गैरफायदा घेऊन तिची दिशाभूल करत बाळाला परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वर्धा येथील चाइल्ड लाइनकडे तक्रार आली होती. अधिकाऱ्यांनी महिलेची भेट घेऊन प्रकरणाची माहिती घेतली. महिलेचे हैदराबाद येथे नरेश चिकटे यांच्याशी लग्न झाले. तिथे मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन झाल्यामुळे तिच्या पतीने तिला तुरकमारी येथे त्यांच्या घरी घेऊन आला. तिच्या पतीला दारूचे व्यसन होते. तो रोज दारू पिऊन महिलेला मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून महिलेने बुट्टीबोरी पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार केली होती. तिच्या पतीने तिला घराबाहेर काढले. ती त्यावेळी ६ महिन्यांची गर्भवती होती. अशा परिस्थितीत बुट्टीबोरी येथील एका महिलेने तिला तिच्या भोजनालयात आश्रय दिला. तिची प्रसूती होईपर्यंत काळजी घेतली. प्रसूती झाल्यावर तिचा परिचय प्रयाग डोंगरे नामक व्यक्तीशी झाला. त्याचे आश्रम असल्याचे तो सांगू लागला. त्यावरून ती त्याच्यासोबत गेली आणि पुनर्जन्म आश्रमात राहू लागली. दोन महिन्यांनी महिलेला तिचे आधार कार्ड काढायच्या बहाण्याने येथे घेऊन गेला आणि एका दापत्याला तिचे बाळ दत्तक देण्यासाठी बेकायदा दत्तक पत्र तयार करून घेतले. महिलेकडून तिच्या बाळाला हिरावून घेतले व परस्पर बाळाला दत्तक दिले, अशी माहिती मिळाली. त्यावरून वर्धा यांनी वर्धा येथील बालकल्याण समितीसमोर महिलेला हजर करण्यात आले. समितीसमोर आपबीती सांगितल्यानंतर, समितीने तातडीने बैठक घेऊन नागपूर येथील बालकल्याण समिती यांना पत्र दिले. चाइल्ड लाइनला संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. नागपूर बालकल्याण समिती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी जिल्हा अधिकारी मुश्ताक पठाण यांना या प्रकरणात चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यावरून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पठाण आणि चाइल्ड लाइनचे वर्धा येथील प्रतिनिधी आशिष मोडक आणि नागपूर चाइल्ड लाइनच्या पथकाने महिलेला सोबत घेऊन बुट्टीबोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेला तिचे बाळ सुखरूप मिळवून दिले. साथ फाऊंडेशन या संस्थेचे अध्यक्ष प्रयाग डोंगरे याने पीडित महिला निराधार असल्याचा गैरफायदा घेऊन तिचे बाळ बेकायदा दत्तक दिले. तसेच पैशांचा व्यवहार केला, असे पीडितेने पोलिसांना सांगितले. प्रयाग डोंगरे याने माता आणि दत्तक दिलेल्या बाळाचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल केले. या कारवाईत बाल संरक्षण कक्षाचे अनिल शुक्ला, चाइल्ड लाइन नागपूरच्या प्रतिनिधी पूजा कांबळे, मेघा रामटेके, सखी वन स्टॉप सेंटर वर्धा येथील रामटेके आणि गजभिये, तसेच वर्धा येथील बाल संरक्षण कक्षाने सहकार्य केले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2T7Ifkb

0 Comments