मुंबई: सेंट्रल बेस्ट बस डेपोजवळ असलेल्या 'सिटी सेंटर मॉल' मध्ये गुरुवारी रात्री ८.५३ वाजताच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाने साडेपाच तास अथक प्रयत्न करूनही आग आटोक्यात आली नाही. आगीची भीषणता वाढल्याने अग्निशमन दलाने अखेर शुक्रवारी मध्यरात्री २.४१ वाजता लेव्हल पाचची झाल्याने 'ब्रिगेड कॉल' जाहीर करीत अग्निशमन दलाची अधिकाधिक यंत्रणा मदतीसाठी बोलावून आग विझविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत तरी आग विझलेली नव्हती. नागपाडा येथील तळमजला अधिक तीन मजली सिटी सेंटर मॉलमध्ये बुधवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने आगीच्या ठिकाणी धाव घेऊन युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरू केले. मात्र काही अवधीतच आगीचा भडका उडाला व रात्री ९.२३ वाजताच्या सुमारास आग लेवल -२ ची झाल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले. मात्र आग आटोक्यात न आल्याने आणि आगीची तीव्रता वाढल्याने अग्निशमन दलाने या आगीची लेवल -३ झाल्याचे रात्री १०.४४ वाजता, आगीची लेवल ४ झाल्याचे रात्री ११.४७ वाजता जाहीर केले. मात्र त्यानंतरही आग आटोक्यात न आल्याने आणि आगीची तीव्रता आणखीनच वाढल्याने अखेर रात्री २.४१ वाजताच्या सुमारास आगीची लेवल - ५ झाल्याने ' ब्रिगेड कॉल' जाहीर करण्यात आला. 'सिटी सेंटर मॉल' तळमजला अधिक तीन मजले स्वरूपाची इमारत आहे. या ठिकाणी प्रारंभी दुसऱ्या मजल्यावर आग लागली. या मजल्यावर मोबाईल, प्रिंटर, स्टेशनरी, फर्निचर आणि इतर साहित्यांचे गाळे आहेत. या गाळ्याना ही आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही आग तिसऱ्या मजल्यावर देखील पसरली असल्याचे लक्षात आले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे २४ फायर इंजिन, १७ जंबो टँक, ६ वॉटर टँकर्स यांच्यासह एकूण ५० अग्नि विमोचक वाहने घटनास्थळी कार्यरत आहेत. तसेच, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्यासह एकूण २५० अधिकारी व कर्मचारी आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. आग विझविताना अग्निशमन दलाचे जवान रवींद्र प्रभाकर चौगुले (५३) यांच्या हाताला मार लागल्याने ते जखमी झाले आहेत तर शामराव बंजारा (३४) यांना आग विझविताना धुराची बाधा होऊन त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांना तात्काळ नजीकच्या जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारानंतर बरे वाटू लागल्याने त्यांना लगेचच रुग्णालयामधून सोडण्यात आले आहे. महापौर किशोरी किशोरी पेडणेकर, आमदार अमीन पटेल, पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी रात्री उशिरा भेट पाहणी केली आणि अग्निशमन दलाकडून आढावा घेतला. ३५०० रहिवाशांचे स्थलांतर आगीची भीषणता पाहता अग्निशमन दलाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने पोलिसांच्या मदतीने 'सिटी सेंटर मॉल' नजीकच्या 'ऑर्किड एन्क्लेव' या ५५ मजली इमारतीमधील अंदाजे ३,५०० रहिवाशांचे सुरक्षिततेदृष्टीने जवळच्या मैदानामध्ये स्थलांतर केले तर काहीजण त्यांच्या नातेवाईकांकडे गेले. तसेच, मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यामध्ये वाहतूक आणि इतर बाबींमध्ये मदतीसाठी पोलिसांना देखील तैनात करण्यात आले आहे. 'सिटी सेंटर मॉल' आगीची तीव्रता लक्षात घेऊन बेलासिस रोडवरील दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/35oG55z

0 Comments